|| हरितालिका व्रताचा उलगडा ||
हरितालिका व्रत एक प्रचलित लोकप्रिय व्रत
हरितालिका व्रत हे हिंदू धर्मातील एक प्रचलित लोकप्रिय व्रत आहे. मात्र आता समाजात या व्रताविषयी अनेक गैरसमज पसरलेले दिसतात. अनेकांमध्ये या व्रताविषयी संभ्रम निर्माण होतो त्याचे समाधान करण्याचा प्रयत्न या लेखाच्या माध्यमातून केला गेला आहे.
हिंदू धर्मातील स्त्री आचारात जितके व्रतवैकल्य सांगितले आहेत त्या सर्व व्रतांमध्ये हरितालिका व्रत हे श्रेष्ठ व्रत म्हणून धर्मशास्त्रांनी गणले आहे.
हे व्रत मोक्षचांद्रिय भाद्रपद शुक्ल तृतीयेला हस्त नक्षत्र युक्त विशेष सांगितले आहे.
व्रत नक्की कोणी करावे -
शास्त्राने हे व्रत संपूर्ण स्त्री जातीसाठी सांगितले आहे. अगदी कुमारिका, सवाष्ण, वैधव्य, सर्वच अवस्थेत असलेल्या स्त्रियांना हे व्रत प्रशस्त आहे. सर्व स्त्रियांना समान अधिकार देणारे हे एकमेव व्रत आहे.
शास्त्र निर्णयानुसार षोडश वयापासून अर्थात सोळाव्या वर्षापासून स्त्रीने हे व्रत सुरु करावे. जेव्हा ती कुमारिका असते तेव्हा तिच्या गुण, रूप संपन्नता, उत्तम कुळातील उत्तम पती व संसारिक सुखप्राप्ती करिता. सवाष्ण स्त्री झाल्यानंतर तिच्या व पती, पुत्र व इतर सर्व कुटुंबाच्या आरोग्य,मांगल्य, सौभाग्य, सुख संपदा व गृहसौख्य करिता.
जर दुर्दैवाने स्त्रीला वैधव्य प्राप्त झाले तर तिच्या गती व मोक्ष प्राप्ती करिता असेही व्रताची फलश्रुती सांगितली आहे.
साक्षात कैलास शिखरावर विश्व चराचराचे माता-पिता भगवान शिवशंकर व भगवती पार्वतीने हे वचन दिले आहे.
हरितालिका हे नाव-
हरिता म्हणजे "हरीत" वर्णाचे अर्थात हिरव्या रंगाने बहरलेले अरण्य व "आलीका" या शब्दाचा एक अर्थ म्हणजे सखी.
सदाशिवाला पती रूपात प्राप्त करण्याकरिता सखी समावेत अरण्यात जाऊन जगतमाता पार्वतीने हे व्रत आचरले म्हणून या व्रताला हरितालिका संबोधले जाते.
गुप्त रहस्य-
आपण बहुतेकांना हा नेहमी प्रश्न पडतो की शिवशक्ती हे तत्व तर अभिन्न आहे तरी शक्तीला शिव प्राप्तीकरिता इतकी तपश्चर्या करण्याचे कारण काय?
खरंतर शिवशंकर हे महायोगी, मुळात वैरागी स्वभावाचे, नित्य स्मशानवासी, गिरिकंधरात सदैव वास्तव्य करणारे. गृहस्थ जीवनात जास्ती न रमणारे.
त्याच्या विपरीत माता गौरी हिमालय राज्याची राजकन्या संपूर्ण लहानपण राजेशाही थाटात माटात वाढलेली. गिरीराजनंदिनी उमा दिव्य कोमलांगी. त्यात वाढत्या वयात पार्वती मातेने राजेशाही जीवनाचा त्याग करून नित्य गिरी- अरण्यात शिव उपासनेत मग्न असे. साधवीचे वस्त्र नेसून रुद्राक्ष अलंकार धारण करून जटाजूट भवानीने प्रथम अल्पाहार, मग एकभुक्त, त्यानंतर वृक्षावरची गळून पडलेली पानं खाऊन फक्त उपासना करत असे. पर्णीका झालेली शैलजा पुढे अपर्णा झाली. पुढे निर्जल, वायु सर्व गोष्टीचा त्याग करून वर्षानुवर्ष शिव तत्वात विलीन झाली. जी स्वतः शिवाचं अस्तित्व आहे ती शिवानी ब्रह्मचारिणी झाली.
भगवतीने तप तिच्यासाठी नव्हे तर आपल्या सर्वांसाठी केले आहे. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रूपात शिवशक्ती एकच असल्यामुळे शक्तीला शिव प्राप्तीकरिता एवढी साधना करण्याची मुळीच गरज नव्हती मात्र जेव्हा ती शक्ती भूमंडलावर अवतार धारण करते तेव्हा पृथ्वीवरील मानविय लिला,नियम हे त्या भगवतीला पण लागू होतात. अर्थात ती नियम व मनुष्य देहाच्या पलीकडे आहे मात्र जेव्हा एक मनुष्य तो दैवी गुणांनी युक्त असला तरीही, प्रत्यक्ष परमेश्वराची प्राप्ती करिता कठोर साधना ही आलीच! ईश्वरी तत्त्व तुल्य बनण्याकरिता शिवोहम् हे प्रत्यक्ष कठोर साधनेच्या माध्यमातून साधकाला प्राप्त करावेच लागते,(जे आपल्याला वेळोवेळी श्रीराम व श्रीकृष्णांच्या चरित्र वर्णनातून दिसून येते) हीच शिकवण ती आदिमाया तिच्या मार्फत संपूर्ण विश्वाला करून दिली. प्रसिद्ध कवी कालिदास यांनीदेखील उत्तम तपसाधनाचे उदाहरण म्हणजे भगवती उमा असे सांगितले आहे.
भगवतीचे हे चरित्र वर्णनात उमा ही अत्यंत चिकाटी व जिज्ञासूपणा दर्शविते त्याच मुळे अनेक प्राचीन शिल्पांमध्ये गौरीच्या पदतळी घोरपडीचे शिल्प दाखवले जाते तिच्यातील चिकाटी पाण्याचे प्रतीक आहे.
दाक्षायणीच्या प्राणत्यागानंतर सदाशिव संपूर्ण एकांतवासात होते. त्यांची शक्ती जरी अप्रत्यक्ष रूपात निराकार स्वरूपात त्यांच्यामध्ये च स्थित असली तरी साकार रुपात देवी सतीच्या जाण्यामुळे त्यांचे मन खूप खिन्न झाले होते. विश्वाच्या घडामोडीत त्यांना जराही रस नसे. अशा वैरागी नाथाला पुन्हा संसारात रमणया करिता, त्यांच्यात असलेली अतुल्य क्षमता व परमज्ञान विश्वात प्रकाशित करण्याकरिता त्या आदिशक्तीला साकार होणे खूप गरजेचे होते. महेश्वास पुन्हा विश्व मायेत गुंतवण्या करिता ब्रह्मादि देवांच्या उपासनेवर प्रसन्न होऊन त्या महामायेने पृथ्वीवर पर्वतराज कन्या म्हणून जन्म घेतला. मनुष्य देहातून प्रत्यक्ष ईश्वरप्राप्तीकरिता कठोर साधनेचा मार्ग तिने दर्शविला व सदा सर्वदा सदाशिवाची वामांगीनी होऊन कैलास शिखरी लिला करू लागली.
अखिल ब्रह्मांडाच्या उत्पत्ती- स्थिती- लयाचे मूळ आधारस्तंभ ! उमामहेश्वर हेच संपूर्ण विश्वाचे मातापिता.
या मुळ आदिमायेने प्रथम दक्ष प्रजापतीच्या शक्ती उपासनेवर प्रसन्न होऊन दक्षकन्या दाक्षायणी भगवती सती म्हणून जन्म घेतला व पुढे सदशिवाची वामांगिनी झाली. मात्र दक्ष यज्ञात झालेल्या अपमाना मुळे देवीने स्वतःची आत्माहुती दिली. विष्णू चक्राने खंडन झालेल्या जगदंबेच्या देह खंडातून शक्तिपीठांची निर्मिती झाली. पुढे हीच विश्वमाता हिमालय राज्याच्या तपसाधने वर प्रसन्न होऊन विश्वकल्यानार्थ पर्वत राजकन्या उमा पार्वती म्हणून जन्म घेतला.व व सदाशिवाला सर्वार्थाने पती रूपात प्राप्त केले.
कैलासस्वामिनी गिरीजा- स्कंद, गणेशाची जननी झाली.
उमा या शब्दाचा अर्थ शास्त्रकारांनी विविध पद्धतीने सांगितला आहे त्यातील एक सर्वात महत्त्वपूर्ण अर्थ म्हणजे ज्याप्रमाणे माळेमध्ये मणी रोवावेत तसे भगवती स्वतःच्या स्वरूपात संपूर्ण विश्वाला रोवते म्हणून त्या आदिमायेला उमा म्हणतात. अशा या उमामहेश्वर याच्या कृपा प्राप्ती करीता हे व्रत धर्मशास्त्रांनी विशेषता स्त्रियांना संधी दिली आहे.
#व्रत विधी:
आदल्या दिवशी हविषान्न (सात्विक) भोजन करून व्रताच्या दिवशी सकाळी आघाड्याच्या काडीने दंत दावण व मांगलिक स्नान करून पूजेची प्रस्तुती करावी. हे व्रत उपोषण प्रधान असून दिवस, रात्रभर हा उपवास असतो दुसऱ्या दिवशी उपवासाचे पारणे सांगितले आहे. मात्र आता धावपळीच्या युगात प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेऊन उपवास धरावा. मुळात उपवास या शब्दाचा अर्थ जरी प्रत्यक्ष रुपात आहार वाचक नसला तरी "उप" अर्थात जवळ व "वास" अर्थात वास्तव्य. आपल्या व्रताच्या देवते जवळ जास्तीत जास्त तन-मन समर्पित करून वास्तव्य सह आराधना करणे म्हणजेच खरा उपवास. मात्र अपचनता, आलस्य, अकाल निद्रा इत्यादी पद्धतीने साधनेत बाधा येऊ नये म्हणून धर्मशास्त्राने या व्रताला अन्न भक्षण कटाक्षाने वर्ज्य सांगितले आहे.
या व्रताच्या विधानानुसार सुशोभित केलेल्या आसनावर वाळूचे शिवलिंग सह मृण्मयी अर्थात मातीच्या सखी व पार्वती मातेच्या मूर्ती शास्त्रोक्त पद्धतीने स्थापन, पूजन, कथाश्रवण,जागरण इत्यादी पद्धतीने उपासना सांगितली आहे. दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा, वायनदाना सह व्रताची सांगता करावयास सांगितले आहे.
गौरीशंकर प्रित्यर्थ प्रीतीभाव ठेवून भक्तीभावाने हे व्रत आचारल्यास श्रेष्ठ फलाची प्राप्ती होऊन जीवनात परमगती लाभते यात संशय नाही, असे वचन खुद्द उमामहेश्वरांनी भविष्यपुराणात वर्णिलेले आहे.
- निहार
#हरितालिका #तृतीया. #तीज #शिवपार्वती
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा