नाथसंप्रदायाशी घट्ट वीण असलेले बस्तवडे गावचे प्राचिन महादेव मंदिर अर्थात नागनाथांचे ध्यानमंदीर
“अलख निरंजन” या शब्दांबरोबरच आपल्या डोळ्यांसमोर हातात चिमटा व त्रिशूळ घेतलेला, दाढी-जटा वाढलेल्या व विशिष्ट वेशभूषा केलेला नाथपंती योगी साधू उभा राहतो.नाथ पंथी साधू म्हणजे विवेक, वैराग्य,योगविद्या व आत्मज्ञान यांचे मूर्तीमंत प्रतिक! याच गोष्टींचा प्रसार संपूर्ण भारतभर नवनाथांनी कित्येक शतके केला.
ह्या अतिप्राचीन नाथपरंपरेचा मुळ स्त्रोत म्हणजे प्रत्यक्ष भगवान शंकर महादेव !
परंतू या परंपरेपैकी नऊ नाथ- नवनाथ हे त्यांच्या महान चरित्रामूळे आणि महिम्यामूळे सुप्रसिध्द आहेत.
नवनाथांचे चरित्र इस १५०० च्या शतकापासून बहुश्रूत झाले. ‘श्री नवनाथ भक्तीसार', 'नाथ लिलामृत’, ‘सिध्द चरित्र’, ‘भक्तमंजिरी माला (खंड २) या ग्रंथामधून हा भक्तीप्रसार-प्रचार झाला आहे.
मराठी,हिंदी, मैथिली, भोजपूरी, आसामी, नेपाली, कन्नडा, तेलग़ू, उर्दू, पंजाबी या प्रमूख भाषांत हा भक्तगण विख़ुरलेला आहे.
संपूर्ण भारत देश, नेपाळ मधील हिंदू समाज, तिबेट मधील काही हिंदू समाज, हिमालयात राहणारा नागा साधू हे भक्त्त राहतो.
दक्षिण काशी असलेले करवीर प्रांत. सध्याचे कोल्हापूर हे देव-देवतांच्या पावन पदकमलाने पवित्र तीर्थ क्षेत्र. ह्या प्रांतात अनेक देवदेवतांनी वास केलेला आहे. हे अनेक शास्त्रे- पुराणे वाचल्यानंतर समजून येते. आज मी आपल्याला अशाच एका अप्रकाशीत मंदिराचा इतिहास सांगणार आहे.
हे मंदिर बस्तवडे ता. कागल येथे आहे. मंदिराची रचना हेमांडपंथीय आहे. याबाबत दंतकथा बहुप्रसुत आहेत. हे मंदीर नवनाथांपैकि नागनाथाचे ध्यान मंदिर होते.
असे म्ह्णतात कि, हे मंदिर पांडवांनी एका रात्रीत बांधले आहे. बांधत असताना सुर्योदय झाला आणि त्यांनी शिखराची शिळा न ठेवताच तिथून पळ काढला.
अंदाजे इस १७००च्या शतकांत पेशवाईने अधर्माची सीमा ओलांडली होती. लोकांच्या जगण्याचा आणि स्वाभिमानाची धुळधान झाली होती. त्यावेळी ह्या प्राचिन महादेव मंदिरावर ह्क्क गाजवायला पुण्याचा कोणी मनोहर जोशी इथे आला होता. त्यावेळी या हे मंदीर जंगलाने वेढले होते. ह्या मंदिराचे पुजा अर्चनाचा ह्क्क व त्याची दिवाबत्तीसाठी वतन मिळणे कामी त्याने पेशव्याला सांगितले होते. सदर ब्राम्हणाचा भक्तीभाव कमी व द्रव्य लोभ जास्त असल्याने सदर ब्राम्हणाला शाप झाला. त्या शापाने त्याचा मृत्यु झाला. त्याच्या मृत्यूनंतर ब्राम्ह्नाच्या वंश नष्ट झाला. त्यानंतर सांगलीच्या पटवर्धन संस्थानातील कुण्या कुलकर्णी ब्राम्हणांने ह्या मंदिरात नित्य नियम करण्याचा प्रयत्न केला. पण त्यालाही अनेक संकटांना तोंड द्यावे लागले. याचे कारण त्याने कर्दळीवनांत वास्तव्यास असलेल्या आपल्या वेदशास्त्रसंपन्न ज्योतिषविशारद गुरूला विचारले असता, त्यानी ह्या मंदिराचा ब्राम्हणांना शाप असून सदर मंदिराचे नित्य कर्म न करण्याबाबत सांगितले. प्रायश्चित म्हणून काशीविश्वेवरास जाऊन राहण्याचा सल्ला दिला. गुरू आज्ञेबरहुकुम त्या ब्राम्हणाने स्वत:चा गाशा गुंडाळून वाराणसीला प्रस्थान केले. त्यानंतर कोणाही ब्राम्हणाने ह्या मंदिराचा नित्यक्रम करण्याचा प्रयत्न केला नाही. कारण विषाची परिक्षा कोण बघा !
नवनाथांना शाबरी विद्या ही अंबामातेच्या सहाय्याने मिळाली म्ह्णुन नाथ मंड्ळीसाठी पार्वतीचा अवतार असलेली अंबा माता अर्थात आई अंबाबाई ही वरदायिनी आहे. नाथांनी आपली आराध्य व श्रध्देय देवता म्हणून अंबामातेचे मंदिराची स्थापना प्रत्येक वास्तव्य ठिकाणी केली. आई अंबाबाईचा आशीर्वाद घेऊनच नित्योपसनाला सुरुवात करत असत.
वेदगंगा नावाने प्रवाहीत असलेल्या नदीकाठी घनदाट जंगलात कोण्याही मणूष्याचा मागमुस नसल्याने ह्या ठीकाणी नाथांनी आपले ध्यान मंदिर स्थापले. अगदी कालपरवा पर्यंत म्हणजे सन १९९९ पर्यंत सुद्धा ह्या मंदिरा सभोवती घनदाट झाडी अस्तित्वात होती. मी व माझे वर्गमित्रांनी ह्या मंदिरात वस्ती करुण मॅट्रीकच्या परीक्षेचा अभ्यास केला आहे. ज्याचा आम्हांला खुप फायदा झाला. आम्ही सर्वजन सामान्य घरातील असल्यामुळे पालकांना शेती, पशुपालन कामांत मदत करत असु. त्यामुळे नित्याचा गृहपाठ वगळता. बोर्डाच्या परीक्षेचा अभ्यास म्हणून जास्तीचे काही करण्याचा वाव मिळत नसे. तशात आमच्या वेळचा काळ हा शिक्षणाला महत्त्व द्यावा इतका सुकाळ नव्हता. एक तर मैदान मारून मिलीटरीत भरती व्हावं किंवा आमदार-खासदाराच्या वशिलाने एखाद्या संस्थेत चिकटावं. ज्याची बरयापैकी परिस्थीती आहे त्याने डीएड करावं आणि मोकार मास्तर व्हावं. हे मास्तर होणं म्हणजे आमच्यासाठी क्लासवन ऑफिसरच. त्यामुळे बोर्डाच्या परीक्षेत एक दिवस आड असणारया पेपरला आदल्या दिवशी वाचून दुसरया दिवशी पेपर लिहुनही आम्ही बरयापैकी मार्काने पास झालो. ही कृपा ह्या महादेवाचीच ! प्रत्यक्ष नवनाथांचा सहवास लाभलेल्या ह्या मंदिरात आम्ही अभ्यास करत होतो. त्यामुळेच आम्ही पास होतोय अशी आम्हा सगळ्यांची श्रध्दा म्हणा किंवा अंधश्रध्दा होती. पण आमच्यासाठी हा वरच होय.
ह्याची प्रचितीसाठी मी काही साधर्म्य सोदाहरण देतो. आप्पाचीवाडी हे हालसिध्दनाथाचे ध्यानमंदिर. कागल येथील गैबीपीर म्हणजे अर्थात गहिनीनाथांचे ध्यान मंदिर. तसेच बस्तवडे हे नागनाथांचे वास्त्यव्य ठिकाण ध्यानमंदिर होय. आज ही परिसरात कोठेही सर्प आढळल्यास सोनगे येथे नुकतेच स्वनिधीतून जिर्णोध्दार झालेल्या चौंडूबाईला नारळ देऊन तिचा अंगारा सर्प आढळलेल्या जागेजवळ फुंकल्यास सरीसर्प दुर निघुन जातात. हा ह्या गावांत भागात राहणारया लोकांचा स्वानुभव सांगतो. चौंडुबाई ही एक देवी यक्षीनीच किंवा अष्टसीध्दी पैकिच एक असावी जी नाथांच्या सेवेसाठी ठाण मांडून बसली आहे. जेणेकरून नाथ ध्यानधारणेत मग्न असताना लोकोध्दाराच्या कार्यात खंड होऊ नये. आज ही इथला कुणबी वर्ग आपले पहिले पीक धान्य हालसिध्दनाथाला अर्पण करतात. नागपंचमीला ह्याच चौंडुबाईच्या मंदिरात भक्तांची अफाट गर्दी असते नारळ ओटी देण्यासाठी. भक्तांच्या संकटकाळात हाकेला दत्त म्हणून उभी राहणारी देवी म्हणून तिची ख्याती आहे. भैरव, रंक, यक्ष, किन्नर, अष्टसीध्दी ह्या नाथांना सहाय्यकारी आहेत. हे नवनाथ चरित्रातून स्पष्ट होते. भक्ती भावाने केलेली प्रत्येक कृती, पुजा, अर्चा ही नाथांना प्रिय आहे. नवनाथ हे द्रवीडांचे सिध्दहस्त मदतगारच. मसिहाच! नाथांना लाह्या फुटाण्याचा नैवद्य खुपच प्रिय. नागपंचमीला इथल्या मंदिरात हाच नैवद्य दाख़वला जातो. नागनाथांचे वास्तव्य ठीकाण म्हणून हातकणंगले तालुक्यातील नरंदे हे गाव खुपच प्रसिद्ध आहे. इस १९८४ ला गंगाभारती महाराज ह्यांनी महाराष्ट्र सरकारची बंदी व मनाई असतानाही जिवंत समाधी घेतली. ज्याचा वृंतात त्यावेळचे एकमेव प्रसार माध्यम साधन असलेल्या सांगली आकाशवाणीवरून प्रसारीत करण्यात आला होता. त्या महाराजांचे नात्यातील एक नातीस त्यांनी १९७१ साली भविष्य कथन केले होते.
हेच गंगाभारती महाराज आपली तिर्थयात्रा नित्यनेमाने करत असत. ते महान तपस्वी होते. ते नरंदे येथून पायी आजरा येथे असलेले रामतिर्थावर स्नानासाठी येत असत. त्यावेळी आवर्जून ह्या प्राचिन महादेव मंदिरात ध्यान धारणा करून पुढे निप्पाणी पासून १० किमीवर असलेल्या शिवपूर (शिप्पुर हा अपभ्रंश) येथे असलेल्या रामलिंग मंदिराचे दर्शन घेऊन पुढे मार्गक्रमण करत असत. ही नाथ संप्रदायातील साधकांची दर्शन मार्गक्रमिका होती. गंगाभारती महाराज यांचे नंतरचे मठाचे उत्तराधीकारी यांनी हा संस्कार कायम ठेवला पण पुढे प्रकृतीस्वास्थ्यामुळे ह्यात ख़ंड पडला.
रामलिंग मंदिर -शिप्पुर |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा