विवाह एक पवित्र बंधन ; त्याला नकारात्मकतेची किनार नको...
हिंदू धर्मात विवाह हा एक संस्कार मानला जातो. हिंदु धर्मातील 'विवाह संस्कार' म्हणजे व्यवहार, ध्येयनिष्ठा, सामाजिक विचार, काव्यात्मकता, वधू-वर आणि त्यांचे कुटुंबीय यांचे उन्नयन अशा अनेक गोष्टींचा सुंदर मिलाप आहे. लग्न म्हणजे दोन मनांचे केवळ एकत्र येणं नसतं तर एकमेकांना समजूतदारपणे जीवनाच्या सुखदुःखात सामील होण्याचे ते एक तत्व असते. पण आज काल मात्र सोशल मीडियावर नवरा बायको मधील अनेक गोष्टींचा बाऊ करून त्याची कुचेष्टा होताना दिसत आहे. नवरा बायको मधील नात्याला हास्यास्पद बनवून काही मंडळी अनेक विनोद करत असतात.. या पवित्र नात्याला त्यामुळे काही वेळेला नकारात्मकतेची किनार लागलेली दिसते.
हे अवडंबर कुठेतरी थांबायला हवं...सोशल मीडियावर नवरा बायको मधील जोक्स वर एका मर्यादेची किनार असावी. लग्न आणि त्या बंधनात असणारे ते दोघे त्यामधील पवित्रताही आबादीत राहिली पाहिजे.
आज विवाहाच्या पद्धती जरी बदलल्या असल्या तरी नवरा बायको हे बंधन मात्र अतुट असावं यासाठी दोन्हीकडून प्रयत्न सुरू असतात. एकानं रुसायचं तर दुसऱ्यांना रुसवा काढायचा.. एकाने दुःखी झालं तर दुसऱ्यांना अश्रू पुसायचे.. एकाला अडचण आली तर दुसऱ्याने त्यावर मात करायची आणि त्या विवाहाला एका गोड बंधनात आयुष्य असेपर्यंत निभावून न्यायचे.. हाच खरं तर विवाहातील गोडवा आहे...
त्यामुळे हा विवाहाचा संस्कार कुठेतरी टिकून ठेवायचा असेल तर सकारात्मक दृष्टीने पावले उचलून नवरा बायकोचे संबंध टिकून राहावे यासाठी आजच्या तरुणाई कडून काही चांगल्या गोष्टी शेअर झाल्या तर समाजात एक चांगला संदेश जाईल. आणि त्यामुळे कुठेतरी घटस्फोटाचे प्रमाणही कमी येईल.
एक चांगलं नातं टिकवण्यासाठी तुमचा प्रत्येकाचा थोडासा हातभार नक्कीच असायला हवा... तेव्हा नवरा बायको नात्यांवरचे फालतू जोक्स थांबवा.. आणि विवाह बंधन अतूट राहण्यासाठी चांगल्या विचारांची राजरोसपणे लय लूट करा...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा