किर्तनकाराचे उपरणेच जेव्हा झोळी बनते पण, कुणासाठी...?
आणूर ता कागल येथील किर्तन सोहळ्यात १५ मिनिटात पार पडला श्रोत्या-वक्त्याचा दातृत्वाविष्कार..!
ऑस्ट्रेलियन नॅशनल विद्यापीठात शिकण्याची संधी राज्य सरकारच्या ७७ लाख रु.च्या शिष्यवृत्तीने प्राप्त होऊन देखील विमान प्रवासासाठी येणाऱ्या खर्चासाठी अडखळत असलेल्या कुरूकली (ता. कागल) येथील कु.प्रतीक दत्तात्रय कांबळे या गरीब विद्यार्थ्याला थेट किर्तन सोहळ्यात किर्तनकाराने झोळी फिरवून व आपले मानधन पाकीट पण त्यात टाकून २१ हजार १०५ रु ची मदत करणारा विधायक उपक्रम आणूर ता कागल येथील किर्तन सोहळ्यात घडून आला.
एमआयडीसी कामगाराचा मुलगा असलेल्या प्रतिक कांबळे या विद्यार्थ्याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपले शिक्षण घेतले इतकेच नव्हे तर प्रसंगी घरामध्ये वीज नसल्याने दिव्याच्या प्रकाशात अभ्यास केला मेकॅनिकल विषयक अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यानंतर त्याला त्याच्या मेरीटवर ऑस्ट्रेलिया येथे उच्च शिक्षणाची संधी मिळाली आहे. आणूर येथील बाल अवधूत संगीत सोंगी भजनी मंडळ व दत्त मंदिर यांनी आयोजित केलेल्या परिवर्तन संस्थेचे मुख्य कृतिशील प्रवर्तक हभप सचिनदादा पवार (पुणे) यांच्या किर्तन सोहळ्यात प्रतीक व त्याचे वडील उपस्थित होते. किर्तनाच्या समारोपात आदरणीय सचिनदादा पवार यांनी प्रतीक बाबत हृदयस्पर्शी असे आवाहन केले. आज दत्त जयंती सोहळा आहे ना तर मग गरजू साठी दत्त होऊन धावून येणे ही खरी सेवा व भक्ती ठरेल असे सांगितले व त्याची सुरुवात त्यांनी स्वतःपासून केली. थेट कीर्तनातूनच त्यांनी आपल्याला देण्यात येणाऱ्या मानधनाची मागणी केली व ते पाकीट घेऊन ते न मोजता कमरेचे उपरणे सोडून त्याची झोळी बनवून त्यामध्ये टाकले व श्रोत्यांना मदतीचे आवाहन केले.
आणि १५ मिनिटात या झोळीत एकूण २१ हजार १०५ रु.चा निधी जमला.तो त्याच उपरण्यात बांधून प्रतिकला सुपूर्द करण्यात आला. ही फक्त मदत नाही तर भाविकांचे आशीर्वाद पण प्रतिकला लाभले आहेत असे म्हंटल्यास ते चुकीचे होणार नाही.
देव धर्म कोणी मानेल न मानेल पण हीच जागा अश्या पद्धतीने सामाजिक कार्यासाठी वापरता येऊ शकते मात्र त्यासाठी सुरुवात आवाहन करणाऱ्यापासून झाली तर ते अधिक सुलभ होते हा देखील एक कृतीयुक्त बोध या प्रसंगातून होतो.
ह.भ.प. मधुकर भोसले
9423278276
🙏राम कृष्ण हरी🙏
उत्तर द्याहटवा