हिंदू धर्मातील त्रिपुरारी पौर्णिमेचे महत्त्व जाणून घेऊया...
कार्तिक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेच्या 'त्रिपुरारी पौर्णिमा' असे म्हणतात. त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजे दिवाळी सणाचा उत्तरार्ध आहे. याच दिवशी देवदिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. कार्तिक शुद्ध पौर्णिमेला हिंदू धर्मातील दोन पवित्र तत्व म्हणजे शिव आणि विष्णू यांची भेट होते.म्हणून घरोघऱी दिवे प्रज्वलीत केले जातात.
घरी रांगोळया काढल्या जातात. फटाक्यांची आतषबाजी होते. कार्तिक पौर्णिमेला मुख्यत्वे करून कार्तिकेयाचे पूजन केले जाते. एकादशीपासून सुरू झालेले तुळशी विवाह करण्याचा हा शेवटचा दिवस असतो. या दिवशी 'हरिहर भेट' म्हणजे विष्णू आणि शंकराची भेट होते, असे मानले जाते. म्हणून त्यावेळी बेल व तुळस वाहून त्यांची पूजा करतात.त्रिपुरारी पौर्णिमा हा भगवान शंभोशंकराच्या विजयाला समर्पित आहे. या दिवशी, भगवान शिवांनी त्रिपुरासुराचा वध केला होता. यामुळे, या दिवशी त्रिपुरा राक्षसाचे प्रतीक म्हणून साडेसातशे त्रिपुरवातींचे हवन केले जाते. त्रिपुरारी पौर्णिमेला भगवान शिवाची पूजा केल्याने जीवनातील अंधकार दूर होतो आणि सर्व समस्यांचे निवारण होते अशी धारणा आहे.दीपोत्सवाप्रमाणे कार्तिक पौर्णिमेलाही करण्यात येणाऱ्या दीपदानाला वेगळे आणि विशेष महत्त्व आहे.
कार्तिक पौर्णिमेला देवी-देवतांना प्रसन्न करून त्यांचे शुभाशिर्वाद घेण्याचा दिवस असल्याचे मानले जाते. या दिवशी देवी-देवतांचे पूजन करून अनावधानाने झालेल्या चुकांबाबत क्षमायाचना करायची असते. देवघरात दिवा लावल्यानंतर घराच्या प्रवेशद्वारावर आणि तुळशीपाशी आवर्जुन दिवा लावावा, असे सांगितले जाते. कार्तिक पौर्णिमेला सायंकाळी चंद्राला अर्घ्य द्यावे, असे म्हटले जाते. असे केल्याने कुंडलीतील चंद्र बळकट होण्यास मदत मिळते, अशी मान्यता आहे असे म्हणतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा