भगवे वस्त्रधारी साधूंच्या छायेत...
संतांची विचारधारा मागे तर पडत नाही ना...?
व्यवहारामध्ये आपण साधु संत येती घरा तोची दिवाळी-दसरा माना असे म्हणतो. त्यांचा आदर करतो. पण संत व साधु यांत सूक्ष्म फरक आहे. हे ध्यानांत घेणे गरजेचे आहे. साधु हे सतत परमार्थात प्रगती करण्यासाठी धडपडत असतात. त्यांचा सर्व वेळ ते परमार्थात घालवत असतात. आपल्या गुरुची आज्ञा घेवून सर्व कामे करीत असतात. पण असे असतानाही केवळ लवकरात लवकर काही गोष्टी पदरी पाडून घेण्याच्या दृष्टिकोनातून स्वतःच्या स्वार्थापोटी काही लोक साधूंचे दास बनत आहेत. त्यांच्या विचारधारेवर चालताना नेमकं ते काय गमावत आहेत याचा अंदाज त्यांना कालानुरूप येइल.तोपर्यंत मात्र ते साधूंच्या अधीन झालेले सध्या तरी चित्र दिसत आहेत. त्यांना स्वत:च्या इच्छेने कोणताही निर्णय घेण्याची मुभा नसते. संत आणि साधू मध्ये बराच फरक असून त्यांची तुलना कोणत्याच दृष्टिकोनातून होऊ शकत नाही.संत हे गुरुच्या आज्ञेत असतात. गुरु म्हणजे संत, हे साधकावस्थेतून वर गेलेले असतात. ते चिंतनशिल असतात. त्यांचे ठिकाणी चंचलता नसते. ते निस्पृही असतात. ते स्वत: जप करुन इतरांचे कल्याण होवो. यासाठी प्रार्थना करीत असतात. त्यांची बौद्धीक पातळी कमालीची वाढलेली असते. ते ज्ञानी झालेले असतात. त्यांचे शब्दाला मोल नसते. त्यांची वाणी प्रभावी असते. ते जसे बोलतात तसेच त्यांचे आचरण असते. अशा संतांच्या चरित्र वाचनातून मोठे होण्यापेक्षा भगवे वस्त्रधारी साधूच्या नादाला लागून सध्याचा सर्वसामान्य मनुष्य आपला बराच वेळ वाया घालवत आहे.
महाराष्ट्राला लाभलेली संतांची परंपरा वैश्विक विचाराला गवसणी घालणारी आहे. प्रसंगी कासेच्या लंगोटाचाही त्याग करण्याची कसोटी संत अत्यंत परखडतेने मांडतात. आधुनिक पुरोगात्मित्वालाही मार्गदर्शक ठरणाऱ्या संतांच्या कसोट्या एकविसाव्या शतकातील साधुत्वाचे बुरखे टराटर फाडतात.
सोन्याच्या अवडंबरापासून ते झेड प्लस सुरक्षेपर्यंतच्या गरजा फकिरी स्वीकारणाऱ्या साधुत्वासाठी खरोखर इतक्या अविभाज्य बनल्या आहेत का? समाजाच्या तामसी प्रवृत्तीत भर घालणारे साधूत्व तुकारामादी संतानी सांगितलेल्या कसोट्यांच्या निकषांवर तसूभरही उतरत नाहीत. धर्माच्या नावावर उतरंडीवरून गडगडणाऱ्या या अवडंबराला टेकू लावणार तरी कोण?
मानवी व्यक्तिमत्त्वांबद्दल अनेक ग्रंथात सूक्ष्म निरीक्षणे नोंदविली आहेत. माणसे आणि समाज समजावून घेताना सामाजिक भाष्य करणाऱ्या समासामधील संदर्भ काही लक्षणे मांडतात.
जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले,
तोचि साधू ओळखावा, देव तेथेचि जाणावा...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा