विविध राशीच्या आईचा स्वभाव व त्यांच्यात राशी स्वामीनुसार असणारे गुण-दोष वेगवेगळे असतात. पण, आपल्या मुलांसाठी ती सदैव झटून, त्यांच्यावर योग्य संस्कार करण्याचा प्रयत्न करतेच. राशीस्वामीनुसार वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धती ती स्वीकारते पण...
मुलामुलींचे कल्याण व्हावे, ते सुखी व्हावे यासाठीच ती नेहमी प्रयत्नशील असते. खरोखरच आईच्या महानतेचं, त्यागाचं वर्णन करणे कठीणच आहे. पाहूया विविध राशींची आई कशी असते.
०१) मेष राशी :- अतिशय बुद्धिमान आणि महत्त्वाकांक्षी असणारी मेष राशीची आई प्रेमळ, मायाळू उदारही असते. मात्र, तिचे हे गुण तिच्या मुलांच्या अनुभवाला तसे कमीच येतात. त्यांच्या वाट्याला येतो तो शिस्तीचा बडगा! आपल्या मुलांनी हुशार असावे, नाव कमवावे, त्यांचे कौतुक व्हावे, अशी तिची जबरदस्त महत्त्वाकांक्षा असते आणि त्याकरता रात्रंदिवस कष्ट घेण्यासाठी ती मागेपुढे पाहात नाही. मुलांवर मेहनत घेते. त्यांना काय हवे नको ते सर्व पाहते, आणि तिच्या मनाप्रमाणे न घडल्यास ‘जमदग्नी’चा अवतारही धारण करते.वाद झाल्यास माघार घेणे, हे तर तिच्या रक्तातच नसते. पण मोठमोठ्याने आरडाओरड करून बोलल्याशिवाय ती शांत होत नाही. मुलांचा अभ्यास घेताना, त्यांना समजावून सांगताना तिचा मानसिक तोल किती वेळ टिकून राहील याचा भरवसा नसतो आणि एकदा मानसिक तोल ढळला की, मग मात्र त्या पोरांची खैर नसते.
मुलांच्या बाबतीत एकदा जर तिने काही ठरवले, तर त्यात यश मिळविण्यासाठी ती आपली बुद्धी, श्रम, पैसा पणाला लावेल परंतु ती त्यासाठी कोणाकडेही हाजीहाजी मात्र करत नाही. ती स्वतःच्या आवडीनिवडी मुलांवर लादण्याचा प्रयत्न करते. इतर मुलांशी तुलना करते, तशी मुलांसाठी त्यांच्या भल्यासाठीच ती सर्व करते, मुले नाराज झालीत तर त्यांची समजूत घालतेे, त्यांच्या भावना जपणे हे तिच्या अखत्यारित बसत नाही. घरातील तिच्या वर्चस्वामुळे आपल्या स्वातंत्र्याला थोडी बाधा आल्याचे मुलांना वाटते.
मुलींनी स्वतंत्र व्हावे, धीट असावे, गृहकृत्यदक्ष असावे, मुलांनी विविध स्पर्धेत भाग घ्यावा, धडाडीने वागावे असे तिला वाटते. मुलांचे लाड करणे हे तिच्या स्वभावात बसत नाही. मुलांना गरजेपेक्षा जास्त स्वातंत्र्य देणे तिला पटत नाही. त्यामुळे मुले थोडी नाराज असतात. तशी ती आदर्श आई ठरू शकेल. तशी मेष स्त्री/आई साधी असते. त्यामुळे मुलांच्या हौशींनाही मर्यादा असतेे. या सर्वांचा परिणाम म्हणजे मोठेपणी मुला-मुलींमध्ये आणि या आईत दरी उत्पन्न होण्याची शक्यता असते. मुलांनी अशा कर्तव्यनिष्ठुर पण कष्टाळू आईचे व तिने घेतलेल्या श्रमांचे जरूर स्मरण ठेवावे.
०२) वृषभ राशी :- हि आई मुलांच्या बाबतीत थोडी हळवी असते. शांत व प्रेमळ असल्याने मुलांवर ओरडणे त्यांना मारणे हे तिला जमत नाही. मुलांनी हौसमौज करावी, आनंदात राहावे, कपडालत्ता चांगला वापरावा, आकर्षक दिसावे. नीटनेटके राहावे, असे तिला नेहमीच वाटते.
मुलांसाठी बाजारात आलेल्या नवीन नवीन गोष्टी, वस्तू ती आणते. अभ्यास, कला, क्रीडा याबाबतीत मुलांच्या आवडीनिवडीचा विचार करून त्यांना त्यासाठी ही आई सहकार्य करते. त्यांच्या मित्रमैत्रिणींचे अगत्याने स्वागत करणे तिला आवडते.
चार माणसात मुलांचा पाणउतारा न करता, त्यांच्या समस्या सोडवण्यास ती मदत करते. त्या स्त्रीची मुले शांत स्वभावाची, मर्यादशील व विनयी निपजतात. आईवर त्यांचे प्रेम असते. मुलांनी कोणाच्या वाटेला जाऊ नये, वादविवाद टाळावेत, आपापसात प्रेमाने वागावे व वडीलधार्याला मान द्यावा, यासाठी ती प्रयत्नशील असते.
हिची मुले थोडी भित्रीच होतात, त्यांच्यात धाडस, समयसूचकता समस्यांना तोंड देण्याचे सामर्थ्य येत नाही. आर्थिक परिस्थिती बिघडल्यास ही आई मुलांना खंबीरपणे वाढवू शकत नाही.
०३) मिथुन राशी :- हि एक प्रेमळ आई असते. आपल्या मुलांवर तिचे कटाक्षाने लक्ष असते. आपली मुले इतरांच्या मानाने कुठेच मागे पडू नयेत म्हणून ती सतत प्रयत्न करते. कष्टाला कमी पडत नाही. चारचौघात वागण्यात, चालीरितीत मुले कुठे कमी पडू नयेत. यासाठी वळण लावण्याचा प्रयत्न करते.
हि आई उत्तम गृहिणी असल्यामुळे मुलांची खाण्यापिण्याची चंगळ असते. सणसमारंभ, लग्नकार्य, वाढदिवस इत्यादीत मुलांसह भाग घेते. त्यामुळे मुलांना पुढील आयुष्यात एकटेपणा जाणवत नाही. पण अनिश्चितता आणि काहीसा धरसोडपणा या तिच्या अवगुणांचा मुलांवर परिणाम होतोच.
यामुळे मुलांना योग्य सल्ला देणे तिला जमत नाही. कारण तिचे सारखे विचार बदलत जातात, याबाबत तिने तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा, ही आई परोपकारी, दयाळू, वर्तणुकीने शालीन असल्यामुळे, या गुणांचा वारसा मुलांना पुढील आयुष्यात पदोपदी उपयुक्त ठरतो.
०४) कर्क राशी :- हि आई मुलांच्या बाबतीत अतिशय भावनाप्रधान असते. मुलांना काही लागले, थोडे जरी बरे नसले तर तिचे कुठेही लक्ष लागत नाही. आपल्या परिवारापासून, मुलांपासून ती दूर राहूच शकत नाही. प्रत्येक मुलाच्या बाबतीत त्याला काय हवे, काय नको याची तिला पूर्ण कल्पना असते.
स्वतःच्या स्वभावात थोडा चंचलपणा असूनही मुलांच्या बाबतीत महत्त्वाचे निर्णय घेताना ती गंभीर, निश्चयी आणि धोरणी बनते. मुलांवर कडक शिस्तीची बंधने न घालता ती त्यांना थोडे फार स्वातंत्र्य देते, पण त्यांच्या प्रत्येक कृतीवर तिचे लक्ष असते.
मुलांची, सतत काळजी, काल्पनिक विचाराने अस्वस्थ होणे हा स्वभाव तिच्या प्रकृतीला त्रासदायक ठरतो. मुलांची लग्न झाल्यावर त्यांच्यावरील अतीव प्रेमासाठी ती काहीशी बेचैन होते.
तिच्या उतारवयात मुले या सर्व गोष्टींची परतफेड करून आनंद देतात. हेच तिच्या आईच्या भूमिकेला पडलेले उत्तम गुण आहे.
०५) सिंह राशी :- सर्वांत हुशार मूल आपलं असावं. बुद्धिमान मूल आपले असावे, सुंदर मूल आपले असावे, जिथे जाल तिथे आपलेच मूल उठून दिसावे, ही तिची जबरदस्त तळमळ असते. त्यामुळे त्यांना घडवण्यात ती आपलं सर्वस्वपणाला लावते. सगळ्यात अद्ययावत,
आधुनिक असे जे शिक्षण ते आपल्या मुलांना मिळावे, हि तिची तळमळ. मुलांनी धीट बनावे, वडिलधार्यांचा मान ठेवावा, समाजोपयोगी कार्य करावे, कोणीही नावे ठेवू नयेत, असे सांभाळून वागावे, अशी तिची शिकवण असते.
तिला पाळणाघर ही संकल्पना मुळीच पटत नाही. प्रत्येक मुलाच्या बाबतीत ती स्वतः निर्णय घेते. कोणाचेही नियंत्रण किंवा सल्ला तिला चालत नाही. परंतु योग्य सल्ल्याचा ती आदरच करते. लबाडीने वागणे, लोकांना फसविणे, फुकटचा बडेजाव, लोकांची हाजीहाजी मुलांनी करू नये यासाठी ती प्रयत्न करते.
मुलांनी मित्रांचा गोतावळा जमवून चकाट्या पिटणे, पार्ट्या करणे हे तिला आवडत नाही. स्वतःची इच्छा, दृढ निश्चयच, प्रयत्न, परमेश्वरातील दृढ श्रद्धा व योग्यता याच्या जोरावर ती मुलाला अव्वल स्थान मिळवून देतेच.
०६) कन्या राशी :- खरे पाहता या स्त्रियांना मुलांची विशेष आवड नसते. मुलांच्या खस्ता काढणे त्यांना नको वाटते. यांच्या अपत्यात मुलांपेक्षा, मुलीच जास्त असतात. त्यांनाही मुलीच जास्त आवडतात.
काल्पनिक संकटांची काळजी करण्याची सवय असल्याने मुलांच्याही बाबतीत नको ते विचार त्या करतात. यामुळे मुलांना आपल्यापासून दूर करणे म्हणजे त्यांना एक शिक्षाच वाटते. या स्वभावामुळे मुलांच्या प्रगतीत मात्र बाधा येते.
मुलांनी अभ्यासात हुशार असावे, लोकांनी त्यांचे कौतुक करावे, याकरता या राशीच्या स्त्रिया नक्कीच भरपूर कष्ट घेतात. मुलांना कणखर व स्वतंत्र त्यांनी बनवावेे, त्यांचा आत्मविश्वास वाढवावा, नाहीतर त्यांना सतत दुसर्याच्या ओंजळीने पाणी पिण्याची सवय लागेल असे ज्योतिषांना वाटतं.
०७) तुळ राशी :- तुळेच्या स्त्रियांना मुलांची आवड थोडी कमीच असते. कष्टाची , त्रासाची कामे करणे या शुक्राच्या तुळेला जरा आवडतच नाही. लहान मुलांना सांभाळणे, त्यांचे कपडे बदलणे, त्यांचे दूध खाणे-पिणे त्यांचे औषधपाणी, त्यांच्यासाठी जागरण करणे या गोष्टीचा या माउलीला थोडा कंटाळाच येतो.
हि कामे आर्थिक सुबत्ता असल्यास, त्या दुसर्याकडूनच करून घेतात. मुलांना सांभाळायला बाई, शिकवणी लावण्याकडे यांचा कल असतो.
हि कामे स्वतः न करता स्वतः आरामात राहून त्या दुसर्यांकडून करवून घेतात. यासर्व गोष्टींमुळे मध्यम किंवा गरीब परिस्थिती असल्यास मुलांना स्वतःची प्रगती स्वतःच करावी लागते, त्यांनी आईकडून खूप अपेक्षा करू नये. हाती पैसा भरपूर असल्यास या राशीच्या आया मुलांचे अव्वाच्या सव्वा हट्ट पुरवतात. मुले जे मागतील ते देऊन स्वतःचे समाधान करून घेतात. या सर्वांमुळे त्यांची मुले बिघडण्याची शक्यता असते.
सुसंस्कृत, आकर्षक, हुशार, रसिक, दिलदार, बोलक्या, दुसर्यांना सहकार्य करणार्या अशा अनेक चांगल्या गुणांनी युक्त असणार्या या स्त्रियांनी मुलांच्या संगोपनाबाबतीतले हे राशीगुण लक्षात घेऊन त्यावर मात करणेच श्रेयस्कर!
०८) वृश्चिक राशी :- मंगळाच्या अधिपत्याखालील या राशीच्या स्त्रियांमध्ये सहनशीलता, विनय, प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, माया हे संततीच्या बाबतीत आवश्यक असणारे स्त्रीसुलभ गुण अभावानेच असल्याने किंवा अशा गुणांचा विकास होऊ शकत नसल्याने त्यांच्याकडून संततीच्या बाबतीत या गुणांची अपेक्षा न करणे उत्तमच.
घमेंड, गर्व, द्वेषभाव या त्यांच्या स्वभावामुळे सध्या जगात चालू असलेल्या स्पर्धेत मुलांनी मागे राहू नये, असे त्यांना मनापासून वाटते. त्यासाठी त्या निश्चितच प्रयत्नशील राहतात. त्यासाठी त्या कडक धोरण स्वीकारण्याची शक्यता असते. वागण्यात जिव्हाळा नसला तरी, खाण्यापिण्यात त्या काही कमी पडू देत नाहीत.
नोकरी, व्यवसायामुळे मुलांना तशीही आईची ओढ कमीच होते. ते यामुळे आईशी मनमोकळा संवाद साधू शकत नाही. बाहेरच्या गोष्टी आईला सांगितल्या जात नाही. यांचा मूड कधी जाईल, कधी या चिडतील याचा भरवसा नसतो. स्वभावही चिडखोर असल्याने मुले काहीशी बिथरून जातात.
मुलांना शिस्त लावणे, शहाणपणाच्या चार गोष्टी त्यांना सांगणे, त्यांचा अभ्यास घेणे, त्यांच्या आवडी-निवडी, भवितव्याचा विचार करणे या गोष्टींसाठी कामांमुळे त्यांना फार वेळ देणे शक्य नसते. आईच्या स्वभावाचा, तिच्या वागणुकीचा अंदाज असल्याने मुले स्वतःच जबाबदारीने वागून यश मिळवतात; नाहीतर भरकटले जातात.
०९) धनु राशी :- संततीच्या बाबतीत धनु राशीच्या स्त्रिया या अत्यंत दक्ष असतात. आपली मुले सर्व दृष्टीने गुणी व्हावी यासाठी सतत धडपडणार्या या स्त्रिया मुलांना शिस्तीत वाढवतात.
मुलांच्या तब्येती चांगल्या राहाव्या, ती निर्व्यसनी असावीत, आज्ञाधारक असावीत, त्यांनी थोरामोठ्यांचा मान ठेवावा, ती अभ्यासाप्रमाणे इतर विषयातही हुशार असावीत, असा त्यांचा प्रयत्न असतो. विशेष म्हणजे मुलेही अशीच निपजतात. सत्कर्माची आवड, ईश्वरावर श्रद्धा असते. भूतदया, परोपकार, दुसर्याला मदत करणे, प्रसंगी धावून जाणे या गोष्टी यांच्यात संस्कारित झालेल्या दिसून येतात.
या स्त्रियांचे आपल्या मुलांच्या प्रत्येक कृृतीवर लक्ष असते. त्यांचे खाणपिणे, आवडीनिवडी पुरवतात. या स्त्रिया मुलांच्या बाबतीत अत्यंत हळव्या असतात. मुलांकडून थोडाही अपमान झाल्यास त्यांना त्रास होतो, त्यांना हा अपमान सहन होत नाही. मुलांवर प्रेमाने का होईना पण हुकमत चालू असते. गुरुची रास असलेली धनूराशीची आई, स्वतःत थोडा बदल केल्यास एक आदर्श आई होऊ शकते, यात शंका नाही.
१०) मकर राशी :- प्रेमळ स्वभाव हा गुण त्यांच्या कोषात सापडणे कठीणच! त्यामुळे त्यांची मुलांशी विशेष जवळीक असणे शक्यच नाही, परंतु शिस्तीच्या बाबतीत मात्र त्या जागरूक असतात.
मुलांची फारशी दयामाया न करता त्या त्यांच्या वागण्यावर लगाम ठेवतात. त्यांचे भलते सलते लाड त्या खपवून घेत नाहीत. खाण्यापिण्याचेही विशेष चोचले पुरवत नाहीत. पण जे आवश्यक असेल ते करण्याचा प्रयत्न जरूर करतात.
त्यांचा काटकसरीपणा, कंजूषपणा याचा परिणाम थोडाफार मुलांवर होतोच. प्रेमाच्या पोटी किंवा निष्कारण काळजीच्या पोटी त्यांना सतत आपल्याजवळ जखडून ठेवणे, हा प्रकार त्यांच्याजवळ नसतो.
शनीच्या अमलाखालील या स्त्रिया न्याय निष्ठूर असल्याने मुलांच्या दोषावर पांघरूण घालत नाहीत, परंतु मुलांच्या बाबतीत कर्तव्यात मुळीच कसूर होऊ देत नाहीत. हेच यांचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.
११) कुंभ राशी :- कुंभेची स्त्री स्वतंत्र विचारांची असते. मठ्ठ वा मंद माणसाबरोबर तिला बोलणे सुद्धा आवडत नाही. तिची प्रत्येक गोष्ट ही बुद्धीशी निगडित असते. आईच्या भूमिकेला त्या उत्तम न्याय देतात यात शंकाच नाही.
स्वतः सुविद्य व सुविचारी असल्याने आपल्या पाल्याला त्या तसेच घडवण्याच्या प्रयत्नात असतात आणि त्यात त्या यशस्वी होतातही. मुलांवर चिडणे, आरडाओरड करणे, मारणे या गोष्टी त्यांच्या स्वभावात नसतात. तरीही मुले त्यांच्या धाकात राहतात.
मुलांवर यांचे पूर्ण लक्ष असते. मुलांचे खाणे-पिणे, त्यांची प्रकृती, त्यांच्या गरजा, याबाबत जास्त गाजावाजा न करता, त्या त्यांचे कर्तव्य प्रेमाने व दक्षतेने पूर्ण करतात. बोलण्यापेक्षा आणि उपदेश करण्यापेक्षा आपल्या वर्तणुकीने त्या मुलांवर संस्कार घडवतात.
त्यांच्या स्वभावातील उत्तमोत्तम गुण, मुलांच्यात उतरतात. खोटे बोलणे, चहाड्या करणे, अफरातफर करणे, एखाद्याची निंदा करणे, थापा मारणे या गोष्टी घरात कधीही न घडल्याने मुले या सर्वांपासून अलिप्त राहतात. या स्त्रियांना संतती कमी असते. त्यामुळे मुलांवर लक्ष देणे त्यांना सहज शक्य आणि सोपे होते.
१२) मीन राशी :- ‘आई’ या भूमिकेबद्दल मीनेच्या स्त्रियांना फार गुण मिळण्याची शक्यता कमीच म्हणायला हवी. यांच्या संततीमध्ये अंतर फार कमी दिसून येते. साहजिकच लागोपाठ गर्भारपण, बाळंतपणामुळे त्यांना स्वस्थता लाभत नाही.
याच्या जोडीला स्वभावातील आळशीपणाही असतोच. या सगळ्यांचा परिणाम मुलांच्या वाढीवर, प्रगतीवर होतो. त्यांना शिस्त लावणे, त्यांच्यावर उत्तमोत्तम संस्कार करणे, त्यांचा अभ्यास घेणे, त्यांना जपणे या गोष्टी त्यांच्याकडून अभावानेच घडतात.
पदरचे मोडून इतरांना मदत करणे, आल्या-गेल्याचा पाहुणचार करणे, शांत राहून सगळ्यांशी व्यवहार करणे, या आपल्या स्वभावातील चांगल्या गोष्टींचे संस्कार मुलांवर आपोआप होतील, त्यांना तसेच वळण लागेल असे त्यांना वाटते.
मुलांना घडवण्यासाठी वेगळी मेहनत घ्यावी लागते हे त्यांच्या लक्षात येत नाही. यातून मुलांकडे नकळत दुर्लक्ष होते. परिणाम व्हायचा तो होतोच! मुलांना चुकीचे वळण लागून ते बिघडण्याची भीती असते. अशी मुलं व्यसनी होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.
कोणाबरोबर चुरस, स्पर्धा हा त्यांचा स्वभाव नसल्यामुळे त्यांच्या मुलांमध्येही तशी ईर्ष्याही दिसून येत नाही. मुलांवर त्यांचे अतिशय प्रेम असते, त्यांच्यासाठी करण्यात येणार्या त्यागाची कमतरता असते.
आईपण निभवताना त्या स्त्रीमधील राशीच्या गुणदोषांचा परिणाम होतोच. खरे आहे, ‘स्त्री ही क्षणाचीच पत्नी असून अनेक काळाची माता आहे’
।।श्री स्वामी समर्थ।।
माहिती संकलित
श्री मनोज देवा
बालमटाकळीकर
९१४५०३२०००
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा