हिंदू धर्मातील हळदी आणि कुंकूचे विशेष महत्त्व जाणून घेऊयात....
हिंदू धर्मातील सर्व थरांच्या स्त्रियांत विशेषप्रसंगी स्त्रियांसाठी हळदीकुंकू समारंभ करण्याची पद्धत आजतागायत सुरू आहे. हे समारंभ म्हणजे गृहिणीपूजन, आदरसत्कार व स्नेहमीलन हा सामाजिक ऐक्यासाठी आवश्यक गोष्टीचे प्रतीक आहे.
पूजा, विधी आणि मंगल संस्कारात कुंकवाबरोबर हळद असते. हळद आणि कुंकू ही सौभाग्यद्रव्ये समजली जातात. हिंदू समाजातील सौभाग्यवती स्त्रिया आपल्या कुंकवासाठी फार जपतात, कारण ते त्यांचे सौभाग्यलेणे असते.
कपाळी कुंकू लावण्याची प्रथा आर्य स्त्रियांनी आर्येतर स्त्रियांकडून अवलंबली आहे. कुंकवाचा रंग लाल आहे. अतिप्राचीन मातृसंस्कृतीमध्ये लाल रंगाला विशेष महत्त्व आहे. आर्येतर लोक हे मातृप्रधान संस्कृतीचे होते. मातृप्रधान संस्कृतीतील कित्येक दैवते रक्तवर्ण प्रिय असणारी आहेत.
इ.स. च्या तिसऱ्या व चौथ्या शतकापासून वाङमयात कुंकवाचे उल्लेख आढळतात. रघुवंशात, अमरशतकात, भतृहरीच्या शृंगारशतकात कुंकमतिलकाला विशेष महत्त्व आहे. ग्रामदेवतांना कुंकू फार प्रिय असल्याचे दिसून येते. दुर्गापुजेतही कुंकवाचे आधिक्य असते. सप्तमातृकांनाही कुंकू प्रिय आहे. पूर्वी कुंकू म्हणजे केशराचा टिळा कपाळी लावत असत.
कुंकू लावण्याच्या प्रथेचा पशुबळीशीही संबंध असल्याचा उल्लेख आहे. शाक्त उपासनेत देवीच्या कपाळी पशुबलीच्या रक्ताचा टिळा लावला जातो. स्त्री ही जगदंबेची अंशरूप असल्याचे मानले असल्यामुळे जेव्हा एखाद्या स्त्रिला गृहलक्ष्मी म्हणून घरात आणावयाचे असते, तेव्हा शिकार करून एखाद्या पशुला मारावयाचे व त्याच्या रक्ताचा टिळा वधूच्या कपाळी लावून मग तिच्यासह गृहप्रवेश करावयाचा, अशी प्रथा दक्षिणेतल्या आर्येतर जातीत होती. विद्यमान काळातही अनेक आदिवासी जमातीत या प्रथेचे अवशेष आढळतात. नवीन लग्न झालेल्या सुवासिनींनी देवीच्या मंदिरात कुंकवाचा सडा घालण्याची पद्धत अनेक ठिकाणी प्रचलित आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा