गुरुसेवा हि अत्यंत कठीण गोष्ट आहे .
संदीपक आणि वेदधर्मा मुनी यांच्या कथेत संदीपकाने एकवीस वर्षे अहोरात्र सेवा केली. (आप्त स्वकीयांच्या आजारपणात रुग्णालयात पाळ्या लावून बसणे जिथे कठीण वाटते तिथे एकट्याने एकवीस वर्षे सेवा आणि तीही गुरूंच्या अत्यंत कठीण अशा शारीरिक अवस्थेत याचा अवश्य विचार व्हावा.)
वेदधर्मा म्हणे आपण l कुष्ठे होईल अंगहीन l अंधक पांगुळ परियेसा ll
शरीर व्यथा हि संतुलन अवश्य बिघडवते ,परिणाम स्वरूप वेदधर्मा मुनी वेदना आणि कष्टाने गांजून गेले . संदीपकाला कधी म्हणावे , भिक्षा आणली असता अरे स्वल्प का आणतोस ? आणि ते अन्न सांडून द्यावे . मिष्टान्न का आणत नाहीस म्हणून ताडन करू यावे ,क्रूर वचनाने विचारावे ,अरे आमचे मलमूत्र का क्षालन करत नाहीस ? अत्यंत खडतर अशा एकवीस वर्षांच्या सेवेने संदीपकाचा उद्धार झाला .
नित्य मनात येणारा प्रश्न म्हणजे गुरुकडे शिष्य हा ज्ञानार्जन करण्यासाठी जातो . तेव्हा ज्ञानार्जनासोबत अशा सेवा घेण्याचे काय कारण असावे ? वास्तविक पाहता सेवा आणि ज्ञान यांचा संबंध इथे जाणून घेणे महत्वाचे ठरते .मनातील अहंकाराला आणि क्रोधाला मारण्यासाठी आणि मनाच्या संयमाकरिता हि सेवा असे .
दत्त माहात्म्यात दत्त महाराजांनी सेवेसाठी आलेल्या कार्तवीर्याला निर्भत्सना करत , जा इथून म्हटले. तर आयु राजाला रे रे मूढ विरूढदर्प अशी हाक मारलेली आहे . ( दत्तचंपू तृतीय स्तबक १४) सार्वभौम राजाला निर्भत्सना करत जा इथून म्हणणे किंवा मूढ या उपाधीने रागावणे हि त्या सार्वभौमत्वाच्या अधिकाराच्या संयमाची परीक्षाच आहे . आधी दर्शन दुर्लभ ,त्यातही सहवास आणि त्यातही सेवेची संधी . एकाहून एक असे दुर्लभ योग असताना उपाधी कोण मिरवेल ?
या गुरु सेवेच्या संबंधी मनात येणाऱ्या किन्तुला काढण्यासाठी गुरुचरित्रात सोळावा अध्याय विशेषेकरून आला आहे . मी पणाला सेवा हि मारक ठरते . हा मी पणा गेला कि ,दत्त माहात्म्यात म्हटल्याप्रमाणे --
जो अहंकारा मारी l त्याचे अंतरी मोक्ष वसे ll श्रीगुरुदेव दत्त !!!--आचार्य .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा